शहीद चंद्रशेखर (सचिन) संजय देशमुख (08/09/80–08/10/2009)
चंद्रशेखर (सचिन) च्या रूपाने संजय – सोयरा देशमुख च्या संसारावर एक गोजिरं फुल उमललं.गोरंपान,देखणं बाळ आई बाबा,नाना आजोबा आणि आईआजी (हेमलता) आणि आजोबांच्या कौतुकात मोठं होऊ लागलं. लहानपणापासून च समजूतदार आणि हुशार असलेला चंद्रशेखर शाळेत चमकू लागला.आई चं मार्गदर्शन आणि उपजत हुशारी, अभ्यासाची आवड त्याला शालेय आणि कॉलेज जीवनात उत्तुंग यश मिळवून देऊन गेली.
घरची शेती असल्याने चंद्रशेखर ने Bsc, MSc Agri.मध्ये शिक्षण घेतलं आणि त्यात विशेष प्राविण्यासह यश संपादन केलं.त्याच्या ज्ञानाचा फायदा वडील संजय यांना होऊ लागला.मग ते बांधावर ड्युरांडो लावणं असो,स्प्रिंकलर पद्धतीने शेताला पाणी देणं,फळशेती करण्यासाठी चे प्रयोग करणं असे अनेक विषय..
खरं तर Msc Agri. झाल्यावर चांगल्या पगाराच्या सुखवस्तू जीवन देणाऱ्या नोकऱ्या त्याच्यासाठी सहज शक्य होत्या. पण लहानपणापासून देशासाठी काही करण्याची जिद्द मनात होती. मेहनती, प्रामाणिक पोलिस ऑफिसर होऊन अन्यायाविरुद्ध भिडण्याची मनात आस होती.आणि म्हणूनच राहूरी च्या कालेज मध्ये असताना च त्याने युपीएससी, एमपीएससी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या.त्यामध्ये ही त्याच्या मेहनती स्वभावाने आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने घवघवीत यश मिळवले.आणि पोलिस सब इन्स्पेक्टर च्या मानाच्या नोकरीत गडचिरोली येथे देशाच्या सेवेसाठी रूजू झाला. आई वडिलांच्या अपरिमीत कष्टांची जाण ठेऊन त्यांचा आणि भाऊ सुजीत चा आधारस्तंभ बनला.
पण नियतीला हे मान्य नव्हतं.
8 आक्टोबर 2009 ला गडचिरोली जिल्ह्यात झालेला नक्षलवादी हल्ला परतवून लावताना अतिशय धैर्याने नेतृत्व करताना या जवानाने पहिली गोळी स्वतःच्या छातीवर झेलली.आणि एक उमदं,हसतं खेळतं, आईवडिलांच्या नजरेत अभिमानाचं, कर्तृत्व फुलून आलेलं,अवघ्या अठ्ठावीस वर्षांचं जीवन देशासाठी शहीद झालं. ज्या दिवशी वडील संजय यांचा आदर्श कर्मचारी म्हणून सत्कार होणार होता त्याच दिवशी नियतीने हा घाला घातला. पण त्या वीर माता पित्याने हे डोंगराएवढं दु:ख पोटात ठेवलं,पचवलं.आणि या शहीद पुत्राच्या मनातील Agro Tourism चं स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं, त्याच्या स्मृतींना चिरंजीव केलं.
शहीद चंद्रशेखर अमर रहे